चंदीगड : ज्या मुलाच्या खांद्यावर आपल्या शहीद पित्याला अंतिम निरोप देण्याची मोठी जबाबदारी होती, त्याला हे ठाऊकही नव्हतं की घरी पोहोचण्यापूर्वी वाटेत त्याच्यावरही काळ झडप घालणार आहे. शहीद सुभेदार मेजर सत्यवान यांचं पार्थिव घेऊन जाणार्या रुग्णवाहिकेला रविवारी सकाळी हायवेवर भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत शहिदाच्या मुलासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शहीद सुभेदार मेजर सत्यवान यांचं पार्थिव चंदीगडहून त्यांच्या मूळ गावी, उत्तर प्रदेशातील देवरिया येथे अंत्यसंस्कारासाठी नेलं जात होतं. या रुग्णवाहिकेत शहीद सत्यवान यांचा मुलगा गौरव सिंह, भाऊ राजन चौधरी, पुतण्या राम समुझ सिंह आणि चालक जसपाल प्रवास करत होते. शहीद पित्याला अखेरचा निरोप मूळ गावी देण्यासाठी संपूर्ण कुटुंब या रुग्णवाहिकेतून सोबत जात होतं. मात्र, सुलतानपूरमधील हलियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वांचल एक्सप्रेसवेवर एका अज्ञात भरधाव वाहनाने रुग्णवाहिकेला अत्यंत जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की रुग्णवाहिकेचा चक्काचूर झाला.
मुलासह चौघांचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या भीषण अपघातात शहीद सत्यवान यांचा मुलगा गौरव सिंह आणि रुग्णवाहिका चालक जसपाल या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेले शहिदाचे भाऊ राजन चौधरी आणि पुतण्या राम समुझ सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकीकडे रुग्णवाहिकेत शहीद सुभेदार मेजर सत्यवान यांचं पार्थिव होतं आणि त्याच प्रवासात त्यांच्या तरुण मुलाचा आणि नातेवाईकांचाही मृत्यू झाला.
शहीद जवानाला अंतिम निरोप देण्यासाठी वाट पाहणार्या मूळ गावी एकाच वेळी चार जणांच्या मृत्यूची बातमी पोहोचताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर तीव्र शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शहीद सुभेदार मेजर सत्यवान यांचं पार्थिव सुरक्षितस्थळी ठेवलं आहे. पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.